पाचोड : पैठण तालुक्यातील पाचोड येथे सोमवार दिनांक २२ जुलै रोजी पहाटे चार वाजता कापड दुकानाला भीषण आग लागून दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील वाडी येथील बळीराम नवले यांचे पाचोड रस्त्यावर जैन इंग्लिश समोर शिवराज कलेक्शन नावाचे कापड दुकान आहे. दुकान मालक बळीराम नवले नित्यनेमाप्रमाणे रविवारी संध्याकाळी दुकान बंद करून जवळच असलेल्या घरी गेले. अडीच तीनच्या सुमारास दुकानांमधून काचा फुटण्याचा आवाज येत असल्याने त्यांनी दुकानाकडे धाव घेतली. त्यांनी दुकानाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला असता दुकानांमध्ये सर्वत्र वीज प्रवाह उतरल्याने त्यांना हलक्या स्वरूपाचा वीजेचा शॉक लागला. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस स्टेशनचे निरीक्षक अतुल इयर, कॉन्स्टेबल सुधाकर मोहिते, विशाल काकडे सुधीर आदींनी घटनास्थळी धाव घेवून अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दल घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने दुकानातील लाखो रूपयाचे साहित्ये जळून खाक झाले आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास पाचोड पोलिस करत आहेत